पुणे – अशास्त्रीय पद्धतीने धोकादायक वृक्षतोड

पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणकडून शहरातील हायटेन्शन केबल आणि विद्युत वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षाची तोडणी केली आहे. मात्र, ही तोडणी अशास्त्रीय पद्धतीने केल्याने पावसाळ्यात ही झाडे रस्त्यावर कोसळून जिवितहानी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

 

त्यापेक्षाही धोक्‍कादायक बाब म्हणजे ही झाडे तोडताना झाडांच्या वजनाचा कोणताही समतोल राखण्यात आलेला नसल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. सिंहगड रस्ता, बिबवेवाडी परिसर तसेच शहराच्या काही उपनगरांमध्ये हा प्रकार घडला आहे.

महावितरणकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरात महावितरणच्या वीज वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटनी केली जाते, पावसाळ्यात हे वाढलेले वृक्ष तारांवर कोसळून जिवितहानी तसेच वीज पुरवठा खंडीत होण्याची भीती असल्याने हे काम मे महिन्यात केले जाते. मात्र, हे काम करताना महावितरणने नेमलेल्या ठेकेदराकडून शास्त्रोक्‍त पद्धतीने झाडांच्या वाढीची दिशा तसेच झाडाचा समतोल लक्षात न घेतात, सरसकट कोणत्याही बाजूला झाड कापले जात आहे.

त्यामुळे या कापण्यात आलेल्या अनेक झाडांच्या वजनाचा समतोल बिघडत असून अनेक झाडे ही रहदारीच्या रस्त्याच्याकडे झुकलेली आहे. शहरात मोठा पाऊस झाल्यास अथवा ही झाडे एका बाजूला वजन झाल्याने भर रस्त्यात कोसळल्यास रस्त्यावरील वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

प्रत्येक वृक्षाचा नैसर्गिक समतोल असतो. त्यामुळे, अशास्त्रीय पद्धतीने ती तोडल्याने ती पावसाळ्यात कधीही कोसळू शकतात. पावसाळ्यात अशा समतोल बिघडलेल्या झाडांची कोसळण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. त्यामुळे, ती योग्य पद्धतीनेच तोडली पाहिजेत.
– सचिन पुणेकर, वृक्षप्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञ

महावितरणने नेमलेल्या ठेकेदारांचे कर्मचारी झाड तोडताना केवळ अडथळा लक्षात घेतात. त्यामुळे कशाही पद्धतीने ती तोडली जातात. त्यामुळे, वृक्षतोड करण्यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्याच्या देखरेखी खाली झाडे तोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून त्याचे पालन होत नाही.
 – अशोक घोरपडे, उद्यान अधिक्षक, महापालिका 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.