पुणे – मैत्रिणीशी चॅटींग केल्याचा जाब विचारत एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलजवळ शनिवारी घडली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात सुरज दत्ता थोरात (रा.भुगाव) आणि त्याच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोनू माणिक खराडे (19,रा. पर्वती पायथा) याची मैत्रिण आणि आरोपी सुरज थोरात याची मैत्रिण एकच आहे. सोनू हा संबंधीत मुलीला शालेय जीवनापासून ओळखतो. दोघेही एकाच शाळेत होते. सध्या महाविद्यालयात असतानाही दोघांची मैत्री टिकून आहे. तर सुरजची संबंधीत मुलीशी महाविद्यालयात आल्यावर ओळख झाली आहे.
तो सतत तीला सोनू बरोबर चॅटींग करु नकोस असे समजावून सांगत होता. मात्र तीने सोनू माझा शाळेपासूनचा ओळखीचा असून मी त्याला भाऊ मानते असे सांगत चॅटींग करत राहिली. याचा राग आरोपी सुरजच्या मनात होता.
यामुळे त्याने सोनूला भेटायला सेंट्रल मॉल येथे बोलावून घेतले. यानंतर मैत्रिणीशी का चॅटींग करतो असे म्हणत लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर , पायावर आणि पाठित मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव करत आहेत.