पुणे – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी रुग्णवाहिका प्रदान करणार असल्याचे सांगितले. या रुग्णवाहिकेचा विद्यापीठाने स्वीकार करावा असे पत्र त्यांनी आज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले आहे.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे,सरचिटणीस परमेश्वर लाड,सचिव ज्ञानंद कोंढरे,उपाध्यक्ष विशाल हुलावळे देखील उपस्थित होते.
यादव म्हणाले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहेमीच समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून योग्य ती कृती आणि काम करण्याची प्रेरणा स्वतःच्या कार्यातून प्रत्येक शिवसैनिकाला दिली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयाने कोविड परिस्थिती नियंत्रणासाठी स्तुती केली आहे.
त्यामुळेच आम्हा शिवसैनिकांनी आरोग्य व्यवस्थे बाबत जागरूक राहणे ही आमची जबाबदारी आहे. युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांनी नेहेमीच पर्यावरण तसेच आरोग्य याबाबत योग्य ती खबरदारी आणि जबाबदारीची वागणूक आम्हाला शिकवली आहे.
विद्यार्थी हित आणि आरोग्य हे प्रत्येक शैक्षणिक संकुलाचे मुख्य कर्तव्य आहे, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या रुग्णवाहिकेचा स्वीकार करावा अशी विनंती आज कुलगुरूंकडे केली असल्याचे देखील यादव यांनी सांगितले.