पुणे – रिक्षा चोरून नेत असल्याचे समजल्यावर दोघा पोलिसांनी चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने मार्शलच्या अंगावर रिक्षा चढवून त्यांना जखमी केले. ही घटना धानोरीतील भैरवनगर-गोकुळनगर भाजी मंडईमागे मंगळवारी सायंकाळी घडली.
या घटनेत पोलीस शिपाई दीपक राजमाने हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश शिरसाट यांनी विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिरसाट आणि राजमाने हे धानोरी मार्शल म्हणून गस्तीवर होते. त्यावेळी “गोकुळनगर भाजी मंडईमागे एक रिक्षा दोन दिवसांपासून उभी होती. ती एक व्यक्ती घेऊन जात आहे,’ असे एका मुलाने सांगितले.
हा चोरीचा प्रकार असावा, असे वाटून दोघेही मार्शल घटनास्थळी गेले. राजमाने यांनी रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा केला. तेव्हा त्याने ताब्यातील रिक्षा पळवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला. राजमाने हे रिक्षासमोर गेले असता, त्याने राजमाने यांच्या अंगावर रिक्षा चढवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
राजमाने यांनी साइड बारला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने रिक्षा वेगात चालवल्याने राजमाने हे जखमी झाले. गणेश शिरसाट यांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा त्याने मोटारसायकलला धडक देत शिरसाट यांना जखमी करून पळ काढला.
मणक्याला जबर दुखापत
दीपक राजमाने हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. या घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर लष्कराच्या
कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिरसाट यांच्या पायाला जखम झाली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करत आहेत.