पुणे – शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने बारा ते पंधरा लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्या प्रकणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा. पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात 44 जणांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. फसवणुकीची रक्कम चार ते पाच कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा शिक्षक भरती घोटाळा राज्यव्यापी असल्याचे समोर येत आहे.
याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षक संघाच्या विविध पदांवर पदाधिकारी आहेत. त्यांचा आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी 2017-18 मध्ये परिचय झाला. यानंतर दराडे याने 2019 मध्ये फिर्यादी आणि इतर काही शिक्षकांना सांगितले की, त्याची बहिण शैलजा दराडे प्रशासकीय अधिकारी असून, शिक्षक भरती, बदली, तलाठी आणि टीईटी परीक्षा पास करणे अशी कामे करते. त्याच्या सांगण्यानुसार फिर्यादी आणि काही शिक्षकांनी शैलजा दराडे यांची पुण्यातील सेंट्रल बिल्डींग येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी दादासाहेब दराडेही तेथे होता. तेथे शैलजा यांनी मी काम करते मात्र माझे नाव कोठेही घ्यायचे नाही. मुंबईतून काम होतेय, असे लोकांना सांगा असे सांगितले. तसेच डी.एड. या पदावर शिक्षक म्हणून 12 लाख रुपये, बी.एड. पदावर शिक्षक म्हणून 15 लाख रुपये, तलाठी पदासाठी 12 लाख आणि टीईटी परीक्षा पास करण्यासाठी चार लाख रुपये असा दर सांगितला. ही रक्कम रोख स्वरुपात स्वीकारणार असल्याचेही सांगितले.
त्यानुसार फिर्यादीने त्यांच्या दोन नातेवाईक महिलांसाठी 12 आणि 15 असे 27 लाख रुपये 15 जून 2019 रोजी दराडे याला हडपसर येथे दिले. यानंतर शिक्षक भरतीच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. यामुळे फिर्यादीने दादासाहेब आणि शैलजा यांना विचारणा केली असता, त्यांनी आणखी दोन-चार याद्या येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी फेब्रुवारी 2020 रोजी शैलजा यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी काम होईल, असे आश्वासन दिले. यानंतर करोनामुळे नोकर भरती बंद असल्याचे सांगत त्यांची बोळवण केली.
दरम्यान, फिर्यादी यांनी पैशासाठी तगादा लावल्यावर दादासाहेब दराडे याने 2021 मध्ये दोन धनादेश देऊन नोटरी करुन त्यावर पैसे देतो, असे लिहून दिले. मात्र दोन्ही धनादेश वठले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले करत आहेत. दरम्यान, याबाबत शैलजा दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
याबाबत फिर्यादी सूर्यवंशी यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. यानंतर दराडे याने भेटून नोटरी करत पैसे देतो, असे आश्वासन दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्याने पैसे न दिल्याने गुन्हा दाखल करा, अशी विनंती हडपसर पोलिसांना केली. मात्र त्यांनी तुमची सेटलमेट झाली आहे, आम्हाला त्रास देऊ नका असे म्हणत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्यव्यापी घोटाळा
तक्रारीत 44 जणांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. ही फसवणूक सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांची आहे. आरोपी दादासाहेब दराडे हा शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असून, त्याने इतर जिल्ह्यातही काम केले आहे. यामुळे त्याने तासगाव, आटपाडी, पंढरपूर, सांगोला आदी परिसरातील नागरिकांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. तसेच यातून राज्यव्यापी शिक्षक भरती घोटाळा उघड होऊ शकतो, अशी शक्यता फसवणूक झालेले शिक्षक आणि त्यांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.