पुणे – कात्रज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कबुतर पकडल्यामुळे एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याला कबुतराची विष्टा खायला लावण्यात आली. यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन घराजवळ सोडण्यात आले.याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह अमोल आडम आणि एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा.सच्चाई माता मंदिर, कात्रज) यांच्या विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुध्द अगोदर गुन्हे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुलाचे वडिल मजुरी काम करतात. त्यांचा बारा वर्षाच्या पिडीत मुलाने सच्चाई मातानगर येथून एक कबुतर पकडून आणले होते. याचा राग मनात धरुन आरोपींनी त्याला मारहाण करत दुचाकीवर जबरदस्तीने बसवले. त्यावेळी त्यांच्याकडे लोखंडी हत्यार होते. हे हत्यार हातात फिरवत त्यांनी दहशत पसरवली, कोणी मधे आले तर एकेकाला जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर मुलाला कात्रज येथील साई अपार्टमेंट इमारतीवर घेऊन गेले. तेथे गेल्यावर मुलाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यात आली. त्यातील एकजण कबुतराची विष्टा घेऊन आला. यानंतर इतरांनी जबरदस्तीने पकडून मुलाला कबुतराची विष्टा खाण्यास भाग पाडले. यानंतर पुन्हा मारहाण करुन ” परत आमच्याकडे कबुतर न्यायला आला तर तुला जीवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली.
थोडयावेळाने त्याला साई मंदिराजवळ सोडले. तेथे पुन्हा पोलिसांना आमचे घर दाखविले तर खल्लास करुन टाकील असा दम दिला. त्यानंतर पिडीत मुलगा चालत घरी गेला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे करत आहेत.