पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाची बिले भरण्याच्या नावाखाली सुमारे चारशें मिळकतधारकांना तब्बल ८ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयावर गेलेल्या नागरिकांकडून कराचे पैसे घेऊन नंतर संबंधित मिळकतीच्या रकमेपोटी महापालिकेस देण्यात आलेले तब्बल १११ धनादेश वटले नसल्याचे समोर आले आहे. हे धनादेश ४०७ मिळकतींचे आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात हा प्रकार घडला असून या केंद्रात काही वर्षांपूर्वी कामास असलेल्या महिलेच्याच नावाचे हे धनादेश असल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान. ज्या मिळकतींसाठी हे धनादेश देण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी किती कर्मचारी सामील आहेत. याची तपासणी महापालिकेने सुरू केलेली असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
असा उघडकीस आला प्रकार
महापालिकेकडून थकबाकी वसूलीसाठी विशेस मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या, अंतर्गत प्रत्येक आठवड्याला थकबाकी पोटी भरण्यात आलेल्या मात्र, न वटलेल्या (बाउन्स) धनादेश दिलेल्या मिळकतधारकांची व त्यांच्या धनादेशाच्या तपशीलाची यादी पालिकेने तयार केली. त्यानुसार, प्रत्येक शनिवारी या बाऊन्स झालेल्या धनादेशाच्या मिळकती सील करण्यात येत आहेत.
त्यानुसार, महापालिकेने डिसेंबर महिन्यात बाऊंस झालेल्या धनादेशाची माहिती घेतली असता सुमारे ४०७ मिळकतींचे तब्बल १११ धनादेश एकाच महिलेच्या बँक खात्यातून आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबधित महिलेच्या नावे असलेल्या मिळकतीचा शोध पालिकेने घेतला असता ज्या थकबाकीपोटी हे धनादेश भरण्यात आले होते. त्यातच या मिळकतींपैकी एकही मिळकत संबंधित महिलेच्या नावाने नसल्याचे आढळून आले आहे.
पैसे घेतले की पैसे घेऊन धनादेश दिले
महापालिका थकबाकीच्या रकमेसाठी मिळकत सील करायला गेल्यानंतर अनेकदा थकबाकीदार पालिकेस धनादेश देतात तर काही नागरिक कर संकलन केंद्रावर येऊन धनादेश देतात. त्यानंतर पालिकेकडून कारवाई केली जात नाही. याच माहितीचा गैरफायदा घेत हा प्रकार केलेला असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी खात्यात रक्कम शिल्लक नसतानाही धनादेश दिले की, रोख रक्कम भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचे पैसे घेऊन त्यांच्या मिळकतीपोटी एकाच महिलेचे धनादेश भरण्यात आले याचा तपास महापालिका करत असून त्याच वेळी महापालिकेकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीयाही सुरू करण्यात आली आहे.
“धनादेश ज्या मिळकतींसाठी भरण्यात आलेले त्यांची थकबाकी आहे. त्यामुळे, धनादेश वटलेले नसल्याने महापालिका या मिळकती सील करणार आहे. नागरिकांनी कोणाला पैसे दिले. धनादेश कोणी भरले याचा महापालिकेशी संबध नाही. मात्र, महापालिकेच्या सीएफसी केंद्रातील हा प्रकार असल्याचे समोर आले आल्याने संबधित विभाग गुन्हा दाखल करेल.” – अजित देशमुख ( उपायुक्त, कर संकलन विभाग)