पुणे – शहरात भरधाव वाहनांच्या धडकेत जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत तब्बल 74 पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षी 34 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यात यावर्षी वाढ झाली आहे.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे म्हणाले, “नवीन विकसित भागांच्या तुलनेत शहरातील जुन्या भागांमध्ये पादचाऱ्यांचा मृत्यू अधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे-सातारा रस्ता, स्वारगेट, शहरातील जुना भाग, डेक्कन, शिवाजीनगर, बंडगार्डन, कोथरूड, वारजे, बाणेर, खडकी, येरवडा या भागांत सर्वांधिक अपघातात पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील जुन्या भागात छोटे आणि अरुंद रस्ते आहेत. या रस्त्यांचा वापर अवजड वाहने, हलकी व्यावसायिक वाहने आणि दुचाकी वाहने करतात. त्याचवेळी, इतर रस्त्यांच्या तुलनेत या रस्त्यांचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहराच्या मध्यभागात वाहनधारक, गर्दीच्या परिस्थितीतही संधी मिळेल तेव्हा त्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. गर्दीच्या परिस्थितीत पादचारी काहीवेळा रस्त्यावरून चालतात. या पादचाऱ्यांना पीएमपीएमएलसह अवजड वाहनांचा फटका बसतो. भरधाव बस, कार किंवा दुचाकीस्वार पादचाऱ्यांना येऊन धडकतात.
शहराच्या जुन्या भागात तीव्र वळण घेत असताना बऱ्याचवेळा अवजड वाहनांचे चालक पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि वाहनाचा मागचा भाग रस्ता ओलांडू इच्छिणाऱ्या पादचाऱ्यांवर आदळतो. कात्रज-देहू रोड बायपासवर भरधाव वाहने काहीवेळा बायपासच्या लेन ओलांडणाऱ्या नागरिकांना ठोकरतात.”रस्ते हे फक्त वाहनांसाठी असतात असा वाहनचालकांचा समज आहे. ही चुकीची धारणा आहे. वाहनचालकांनी रस्त्यावरील पादचाऱ्यांचा आदर करणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी पादचारी रस्ता ओलांडताना दिसल्यावर वाहनाचा वेग कमी करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
“आम्ही पुणे महापालिकेला (पीएमसी) स्वारगेट, कात्रज, खराडी, अलका या प्रमुख जंक्शनसह शहरातील रस्त्यांवर पादचारी क्रॉसिंग सिग्नलची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे. प्रमुख चौक आणि रस्त्यांवर आम्ही नागरी संस्थेला झेब्रा क्रॉसिंग व्यवस्थित रंगवण्यास सांगितले आहे. आमच्या आघाडीवर आम्ही रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करत आहोत.” – राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक