नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन यांचा राजकारणात भ्रमनिरास झाला आहे. ई श्रीधरन यांनी गुरुवारी भाजप सोडण्याची घोषणा केली आहे.
श्रीधरन म्हणाले की, मी आता 90 वर्षांचा झालो आहे. वयाच्या बाबतीत मी माझ्या आयुष्याच्या शीर्षस्थानी आहे. मी सक्रिय राजकारण सोडत आहे पण याचा अर्थ मी राजकारण सोडत आहे असे नाही. निवडणूक हरल्याचंही दु:ख आहे. मी कधीच राजकारणी नव्हतो, मी नोकरशहा होतो. मी सक्रिय राजकारणात नसलो तरी इतर मार्गाने जनतेची सेवा करेन. माझ्याकडे तीन ट्रस्ट आहेत, त्यात मला काम करायचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दिल्ली मेट्रोसह राज्यातील अनेक शहरांच्या मेट्रो नेटवर्कची ब्लू प्रिंट तयार केल्याने ई श्रीधरन यांना मेट्रो मॅनचे नाव देण्यात आले होते. केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व घेतले होते. केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. श्रीधरन यांनी केरळ विधानसभेची निवडणूक पलक्कडमधून लढवली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पलक्कड जागेवर काँग्रेसच्या शफी पारंबिल यांनी भाजपच्या ई श्रीधरन यांचा 3859 मतांनी पराभव केला. शफी पारंबील यांना 54079 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार ई श्रीधरन यांना 50220 मते मिळाली.
मेट्रो मॅन ई श्रीधरन यांचा जन्म 1932 मध्ये केरळमधील पलक्कड येथे झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण पलक्कड येथूनच केले. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. 1953 मध्ये त्यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर ते 1970 मध्ये सुरू झालेल्या कोलकाता मेट्रो प्रकल्पाचाही एक भाग होते. पुढे त्यांना रेल्वे बोर्डाचे सदस्यही करण्यात आले.
1990 मध्ये त्यांच्या निवृत्तीपूर्वी त्यांना कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आले. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली. दिल्ली मेट्रोचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मेट्रो मॅन ही पदवी देण्यात आली.