पुणे – विद्येचे माहेरघर अशी पुण्याची मूळची ओळख आहे. मात्र, अलिकडच्या काळात त्याचे रुपांतर वाहन चोरट्यांचे शहर अशीच व्हायला लागली आहे. मागील सव्वातीन वर्षांत शहरातून तब्बल ५ हजार ८२२ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, रिक्षा आणि मोटारींचा समावेश आहे. या वाहनांची किंमत २४ कोटी ६८ लाख रुपये आहे. शहरभर सीसीटीव्हीचे जाळे असूनही, चोरटेही सापडत नाहीत आणि चोरीची वाहने बेपत्ताच, अशी स्थिती आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरटे सापडत नसले, तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरच कॅमेर्यातून नजर ठेवली जात आहे. त्यातून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चोर्या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
विशेषत: परिमंडळ ५ व ४ मध्ये सर्वाधिक वाहन चोर्या होत आहेत. परिमंडळ पाचमधील हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ परिमंडळ चारमधील खडकी, विश्रांतवाडी, चतु:शृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ आणि लोणीकंद या पोलिस ठाण्यांतही अधिक गुन्हे घडलेले आहेत.
अडीच महिन्यात ४०० वाहने गायब
गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरी ही पुणे पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. या वर्षाच्या प्रारंभीपासूनच चोरट्यांनी वाहन चोरीचा धडाका लावला आहे. जानेवारीपासून अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपयांच्या घरात आहे.
शहरातून दिवसाला सहा ते सात वाहने चोरीस जातात. कधीकधी हेच प्रमाण ऩऊ ते दहाच्या घरांत असते. वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना म्हणावे तसेे यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दोन पथके तरीही अपयश
चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहन चोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली. त्यांची उत्तर दक्षिणमध्ये विभागणी करून कामाचे वाटपही केले; पण या पथकांना वाहन चोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात म्हणावे तसे यश आलेले दिसत नाही. वाहन चोरीविरोधी पथके ही फक्त नावालाच आहेत की काय, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वाहने जातात तर कुठे आणि चोरीची कारणे काय?
बऱ्याचदा चोरलेल्या वाहनाचा नंबर बदलला जातो, तसेच ती गुन्हेगारांकडून दारू तस्करी, घरफोड्या, सोनसाखळी अशा गुन्ह्यांत वापरल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. काही वाहनांची बाहेरच्या जिल्ह्यात किंवा परराज्यात देखील विक्री केली जाते. त्यामुळे त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसून येते.
पाहा आकडे काय म्हणतात..
वर्ष वाहने चोरी वाहनांची किंमत
२०२१ १५२९ ६ कोटी ४९ लाख ४२ हजार ९३२
२०२२ १९०१ ७ कोटी १४ लाख ५० हजार ६५६
२०२३ १९९२ ९ कोटी ५३ लाख १७ हजार ६४
२०२४ ४०० १ कोटी ५१ लाख ८४ हजार ९०८
(१७ मार्चअखेर)