पुणे -म्हात्रे पूल ते कर्वेनगरदरम्यानच्या राजा मंत्री रस्त्यावर अतिक्रमण कारवाईनंतर आत पाणीपुरवठा विभागाने नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 15 बेकायदा नळजोड तोडले असून, मोटार आणि पाइपदेखील जप्त केले आहेत.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्यावरील बेकायदा हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि दुकानांवर नुकतीच कारवाई केली. या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतानाही पाणी जोड कसे दिले गेले, असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर येथील मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि गॅरेजना पाणीपुरवठा कसा होतो?, येथे अधिकृत नळजोड दिले गेले आहेत का? याचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने येथील पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वेक्षण केले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत ही कारवाई करण्यात आली. येथील मंगल कार्यालये आणि हॉटेल्सची संख्या अधिक असल्याने अनेकांनी एकपेक्षा अधिक नळजोड घेतले आहेत. यामध्ये 25 नळजोड हे अधिकृत असून, तेथे मीटरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी केवळ बोअरच्या पाण्याचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे. एका मंगल कार्यालयचालकाकडून पाणी बिलाची 2 लाख 61 हजार रुपयांची थकबाकीही तातडीने वसूल करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.
या कारवाईत अर्धा इंची 7 नळजोड, एक इंची तीन नळजोड आणि पाऊण इंचाचे पाच बेकायदा नळजोड बंद करण्यात आले. तसेच एका प्रसिद्ध हॉटेलमधील पाण्याची मोटार आणि पाइपही जप्त करण्यात आला. – अनिरूद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका