बारामती – एकाला मुदत खरेदीखत लिहून देत ती जमीन परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तात्रय शंकर यादव (रा. जळोची ता. बारामती) व जमीन विकत घेणारे सखाराम सदाशिव पवार (रा. लाकडी, ता. इंदापूर) या दोघांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिट्टू भीमराव सकट (रा. तांदूळवाडी, बारामती) यांनी या प्रकरणी बारामती न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सकट व यादव यांच्यात मैत्री होती. सकट यांनी मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशांबाबत यादव यांना माहिती होती. त्यांनी सकट यांना आर्थिक नड असल्याचे सांगितले. चोपडज येथील गट क्रमांक 274 मधील यादव यांच्या 16 आर क्षेत्र पैशांच्या बदल्यात मुदत खरेदीखताने सकट यांना दिले. 16 मार्च 2019 रोजी हे मुदत खरेदीखत झाले. सहा महिन्यांची मुदत त्यात नमूद करण्यात आली. त्यापोटी सकट यांनी यादव यांना 4 लाख रुपये दिले. दरम्यानच्या काळात यादव याने सखाराम सदाशिव पवार यांना 17 जून 2019 रोजी हेच 16 आर क्षेत्र पाच लाखांत खरेदीखताने दिले.
सकट यांनी यासंबधी यादव यांना विचारणा केली असता,त्यांनी शिवीगाळ करीत पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी भाषा वापरत सकट यांच्यावरच अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. ऍड. सुधीर पाटसकर यांच्यामार्फत खरेदीदस्तासाठी नोटीस पाठवली. यादव यांनी नोटिसीला उत्तर दिले नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. फिर्यादी हे अनुसूचित जाती-जमातीचे असल्याने या प्रकरणी ऍट्रॉसिटीही दाखल झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अधिक तपास करीत आहेत.