पुणे – भारताच्या सीमेवर प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून सुमारे ४०० किलो तिळगूळ देशाच्या सरहद्दीवर सैनिकांना पाठवण्यात आला. भारत माता की जय… अशा घोषणा देऊन सैनिकांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करीत गणरायाच्या मंदिरात तिळगूळाचे पूजन करण्यात आले. हा आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करुन दिली.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्यावतीने सोमवार पेठेतील त्रिशुंड्या गणपती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ लेखिका डाॅ. कांचनगंगा गंधे, नूमवि प्रशालेचे माजी मुख्याध्यापक रमेश परचुरे, शाहीर हेमंत मावळे, शिरीष मोहिते, मिलिंद मुजुमदार, रत्नाकर दिवाकर, मुकुंद जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सचिन पवार, संगीता मावळे, सुशील भिसे, सूरज गावडे, अभिजीत रेणुकदास यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
एखादा उपक्रम हाती घेतला तर त्यामध्ये सातत्य हवे असते. हे सातत्य सैनिक मित्र परिवारामध्ये दिसते. देशवासियांचे हे प्रेम आणि तिळगूळ पाहून सैनिकांना सिमेवर लढण्याचे बळ नक्की मिळत असेल. सैनिकांच्या कुटुंबांच्या मागे सैनिक मित्र परिवारासारख्या संस्थांनी ठामपणे उभे रहायला हवे. त्यामुळे सैनिकांमध्ये भारतीयांविषयी असलेला आत्मविश्वास अधिक दृढ होईल, असे गोयल म्हणाले. शाहीर हेमंत मावळे यांनी प्रास्ताविक केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.