पुणे – 38 हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण

‘आरटीई’अंतर्गत लॉटरी : 29 हजार विद्यार्थ्यांकडून प्रवेश नाही

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार “आरटीई’अंतर्गत आतापर्यंत 38 हजार विद्यार्थ्यांनी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. अद्यापही सुमारे 29 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाची लॉटरी लागूनही प्रवेश घेतलेला नाही.

खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये “आरटीई’ अंतर्गत 25 टक्‍के प्रवेशाच्या जागा भरल्या जातात. यंदा राज्यात 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी एकूण 2 लाख 44 हजार 934 ऑनलाइन अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठी 8 एप्रिल रोजी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात एकूण 67 हजार 706 विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश होणार आहेत.

लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मुदतीमध्ये सर्वच पालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी आता 4 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीत तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार का असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. आणखी मुदतवाढ द्यावी लागेल अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

पालकांनी ऑनलाइन अर्ज भरताना बऱ्याच चुका केल्या आहेत. या चुकांमुळे प्रवेशात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. चुकांमुळे पहिल्या टप्प्यात अनेकांना प्रवेश मिळाला नाही. अर्जात दुरुस्ती करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येऊ लागली आहे. त्यातच पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी लवकर पूर्ण केली जात नसल्याचीही बाब उघडकीस आली आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्व जागांचे शाळांमध्ये प्रवेश झाल्यानंतरच प्रवेशाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात 963 शाळांमध्ये 16 हजार 580 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यासाठी 53 हजार 679 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यातील 12 हजार 566 जणांना पहिल्या टप्प्यात लॉटरी लागली आहे. यातील 7 हजार 776 जणांनी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे.

जिल्हानिहाय शाळा प्रवेश विद्यार्थ्यांची संख्या
पुणे – 7776, अहमदनगर – 962, अकोला – 1159, अमरावती – 1182, औरंगाबाद – 1955, भंडारा – 511, बीड – 892, बुलढाणा – 804, चंद्रपूर – 641, धुळे – 487, गडचिरोली – 271, गोंदिया – 568, हिंगोली – 137, जळगाव – 1182, जालना – 670, कोल्हापूर – 473, लातूर – 734, मुंबई – 2040, नागपूर – 3309, नांदेड – 1069, नंदुरबार – 76, नाशिक – 2304, उस्मानाबाद – 306, पालघर – 283, परभणी – 433, रायगड – 1379, रत्नागिरी – 100, सांगली – 128, सातारा – 591, सिंधुदुर्ग – 52, सोलापूर – 617, ठाणे – 3589, वर्धा – 738, वाशिम – 267, यवतमाळ – 614.

Leave A Reply

Your email address will not be published.