पुणे – पावसाळ्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांच्या मदतीला तब्बल 700 ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येणार आहेत. मागील वर्षी ही संख्या 450 होती. तरीही शहराला मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला होता.
याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली. नुकतीच महापालिका प्रशासन, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, मेट्रो तसेच पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे प्रकल्प, मेट्रोचे काम, तसेच वर्दळीच्या पण अरूंद रस्त्यांच्या ठिकाणी हे वॉर्डन मदतीला असतील. पावसाळयात ठिकठिकाणी पाणी साचते. सध्या अनेक भागांत उड्डाणपूल तसेच मेट्रोची कामे प्रमुख रस्त्यांवरच सुरू आहेत. परिणामी, पावसाळ्यात वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होते. यावर महापालिका, मेट्रो तसेच पोलिसांकडून वॉर्डनची नियुक्ती केली होती. ही संख्या सुमारे 400 ते 450 होती. मात्र, त्यानंतरही अनेक भागात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता.
या ठिकाणी वाढविणार संख्या
उड्डाणपुलाचे काम सुरू असलेली ठिकाणे
मेट्रो मार्गाचे काम सुरू असलेले रस्ते
शहराच्या मध्यवर्ती भागांतील व्यापारी पेठा
वारंवार पाणी साचणारी ठिकाणे
शहरातील प्रमुख चौक