पुणे – सॉफ्टवेअर व्यावयायिकाकडून 300 जणांची फसवणूक

पुणे – खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे आणि शेतीमालाच्या आडत व्यावसायिकासाठी तयार केलेल्या वैयक्तिक सॉफ्टवेअरचा सोर्सकोर्ड, व्यावसायिक माहिती आणि पासवर्ड यांची चोरी करून तथाकथित सॉफ्टवेअर व्यावसायिकाने शहर आणि परिसरातील 300 हून अधिक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

शहरातील नामांकित हॉटेल, लॉन्ड्री, शीतपेय व्यावसायिकांना ते विकल्याचे मार्केटयार्ड पोलिसांच्या तपासात आढळले आहे. याप्रकरणी मार्केटयार्डातील कांदा-बटाट्याचे आडते किशोर कुंजीर (वय 49, रा. एनआयबीएम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश जेवरे (वय 42, रा. कुदळे पाटील टाऊनशिप, माणिकबाग, सिंहगड रोड) याला 29 मार्च रोजी अटक झाली. त्याची रवानगी शनिवारी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीर यांचे मार्केटयार्डात 5 गाळे आहेत. व्यवसायासाठी त्यांना सॉफ्टवेअरची गरज होती. त्यांनी स्वतः आर्किटेक्‍चर डिझाईन केले व स्वतःच्या व्यावसायिक गरजांनुसार सॉफ्टवेअर 1995 मध्ये तयार करून घेतले. या सॉफ्टवेअरच्या अपग्रेडेशनसाठी 2007 मध्ये जेवरे यांनी इच्छा दाखविली. त्यासाठी कुंजीर आणि जेवरे यांनी करार केला. परंतु, एप्रिल 2016 पर्यंत जेवरेने ही जबाबदारी हेतुपुरस्सर पूर्ण केली नाही, तसेच कुंजीर यांच्या संगणक प्रणालीचा सोर्सकोड व व्यावसायिक स्थित्यंतराची माहिती, बदल यांची चोरी केली. त्यामुळे कुंजीर यांचे व्यावसायिक अडवणूक व आर्थिक फसवणूक झाली. कुंजीर यांचे सॉफ्टवेअर स्वतःचेच आहे, असे भासवून जेवरेने पुणे तसेच बारामती, जुन्नर येथील बाजार समितीमधील आडते व व्यापाऱ्यांसोबतच सुजाता कोल्ड्रीक्‍स, डिलक्‍स ड्रायक्‍लिनर्स, हॉटेल शुभम, वेदांत प्युअर व्हेज, शिवराज कोल्ड स्टोरेज, चंद्रमा रेस्टॉरंट आदींना त्याची विक्री केली.

याबाबत कुंजीर यांनी पोलीस आयुक्तालयात सायबर सेलमध्ये तक्रार केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास मार्केटयार्ड पोलिसांकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी जेवरेच्या अप्पा बळवंत चौकातील ओंकार अपार्टमेंट येथील ऑफिसची झडती घेतली. तेव्हा त्यात ती प्रणाली विकलेल्या 300 जणांची नावे सापडली, अशी माहिती मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांनी दिली. आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. या गुन्ह्यात सायबर क्राईम तज्ज्ञ संदीप गादीया यांनी पोलिसांना तपासात मदत केली. हवालदार मंगेश साळुंके यांचाही तपासात सहभाग आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)