पुणे – पुणे परिमंडलामध्ये वाढती ग्राहकसंख्या व विजेची मागणी पाहता सन २०५० पर्यंत दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी २२० केव्हीचे १४ तर १३२ केव्हीचे ३ अशा १७ अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांची आवश्यकता असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेमध्ये ३७ नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.
पुणे परिमंडलामधील विविध कामांचा आढावा घेताना पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त), ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे परिमंडलातील २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता अतिउच्चदाबाचे किमान १७ उपकेंद्रांची उभारणी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
यात २२० केव्हीच्या बालेवाडी, चऱ्होली, वाघोली, रिव्हरव्ह्यू मगरपट्टा, ताथवडे, मोशी, बावधन, म्हाळुंगे, रोहकल, गहुंजे, कडूस, कोलतेपाटील नेरे हिंजवडी, मांजरी, सेक्टर १२ प्राधिकरण तसेच १३२ केव्हीच्या खानापूर, कात्रज, भूगाव नॉलेज सिटी येथील अतिउच्चदाब उपकेंद्रांचा समावेश आहे. यातील चऱ्होली व सफारी पार्क येथील अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी सेन्चुरी एन्का अतिउच्चदाब उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे.