पुणे – जागेतील वादातून कपाऊंडमध्ये घुसून मारहाण केल्याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच जणांना सुनावलेली सुधारायची हमीचा पत्र आणि प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा रद्द झाली आहे. घटनेचे सर्व साक्षीदार हे एकाच घरातील आहेत. गुन्हा सिध्द करण्याकरीता पुरेसा पुरावा नाही, हा बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शिक्षा स्थगित करून 5 जणांची निर्दोष मुक्तता केली.
सुनील मोडक, अनिल मोडक, विशाल मोडक, कमलेश मोडक आणि योगेश मोडक अशी पाच जणांची नावे आहेत. त्यांच्या वतीने ऍड. प्रणित नामदे आणि ऍड. अजित पवार यांनी न्यायालयात बाजू मांडली. वडकी येथे शेजारी राहणारे डॉक्टर मयुर शिंदे आणि मोडक यांच्या जागेवरून वाद होता. या वादातून 2009 मध्ये पाच जण, इतरांनी मिळून डॉकटरच्या कंपाऊंडमध्ये घुसखोरी करून, रुग्णालयातील वस्तुंची तोडफोड आणि घरातील लोकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.
याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाला. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी साक्षी पुराव्याच्या अनुषंगाने पाच जणांना दोषी धरून शिक्षा सुनावली. या शिक्षेविरूध्द ऍड. प्रणित नामदे आणि ऍड. अजित पवार यांचे मार्फत सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.