पुणे – 12 हजार मातांची प्रसूती अजूनही घरीच!

ग्रामीण भागात दळवळणाच्या सुविधा नसल्याचे वास्तव

पुणे – माता आणि बालकांच्या मृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, नागरिकांची मानसिकता अद्यापही बदलली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात महिलांची प्रसूती घरीच होण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नसल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात तब्बल 12 हजार महिलांची प्रसूती रुग्णालयाच्या ऐवजी घरीच झाली आहे. त्यामुळे महिला आणि मातांच्या आरोग्याच्या बाबतीत अद्यापही फारशी काळजी घेत नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अमरावती, नंदूरबार आणि गडचिरोली या जिल्ह्यांत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात आजही दळणवळणाची फारशी सोय नाही. त्यामुळे दवाखान्यात जाण्याऐवजी घरीच प्रसूती करण्याचा पर्याय स्वीकारला जातो. सुरक्षित मातृत्वासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानापासून मातृत्व वंदन योजनांसह इतर योजनांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यामुळे सर्वत्र रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीच्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, आदिवासी भागातील मेळघाट, नंदूरबार आणि गडचिरोली यासारख्या भागात मोठ्या प्रमाणात प्रसूती घरीच होत आहेत. राज्यात 1 एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीतीलही आकडेवारी समोर आली आहे.

जिल्हा घरी – प्रसूती झालेल्या गर्भवती
ठाणे – 2,275
नाशिक – 6, 248
पुणे – 149
कोल्हापूर – 38
औरंगाबाद – 213
लातूर – 185
अकोला – 1,760
नागपूर – 1,082
भिवंडी – 926
मालेगाव – 773
नवी मुंबई – 100
वसई- विरार – 90

माहेरघरासह अन्य योजनांमुळे घरी होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण एक टक्‍क्‍यावर आणण्यात यश आले आहे. यापुढील कालावधीत सर्व दुर्गम भाग आणि खेड्यापाड्यात लक्ष केंद्रित करुन ही संख्या आणखी कमी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
– डॉ. अर्चना पाटील, संचालक, कुटुंब व कल्याण, आरोग्य सेवा, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.