पुणे – मदत कक्षाद्वारे 11 हजार अर्ज निकाली

अर्ज घेण्याची सुविधाही बंद : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती

पुणे – शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अडीच महिन्यांत दाखल झालेले 11 हजार अर्ज मदत कक्षाद्वारे निकाली काढण्यात आले आहेत. आता उमेदवारांकडून अर्ज घेण्याची सुविधाही बंद करण्यात आली आहे.
पोर्टलवर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी मुदतीत नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र, यातील बहुसंख्य उमेदवारांनी परिपूर्ण माहितीच भरली नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते. हे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होऊ नयेत यासाठी त्यांना माहिती भरण्यासाठी अनेकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांची नोंदणी करणे, प्रवर्ग बदल करणे, अर्ज स्वप्रमाणित करणे, अर्जाची प्रिंट काढणे याबरोबरच इतर बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात मदत कक्ष सुरू केला होता.

या कक्षात उमेदवारांची नेहमीच गर्दी झाल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळाले. उमेदवारांकडून माहितीत दुरुस्ती करण्याबाबतचा लेखी अर्ज व ओळखपत्र स्वीकारून त्याला माहिती अपडेट करण्यासाठी अनेकदा लॉगिन ओपन करून देण्यात आले होते. राज्यातल्या विविध ठिकाणच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात समावेश होता. 3 एप्रिलपर्यंत उमेदवारांना माहिती अपडेट करण्याकरीता शेवटची संधी देण्यात आली होती. त्यानंतर काही स्वप्रमाणित अर्जाच्या प्रिंट काढून देण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत सुविधा सुरू ठेवण्यात आली होती. याचा बऱ्याचशा उमेदवारांनी फायदा करून घेतला.

मदत कक्षात दाखल झालेले सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कामगिरी पूर्ण केली. उमेदवारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरणही करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.