उन्हाळी सुट्टीत पर्यटनक्षेत्रांसाठी एसटी बसेसच्या जादा फेऱ्या

पुणे – वाढता तोटा भरून निघावा आणि महसुलात वाढ व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उन्हाळी सुट्ट्यांत राज्यभरातील पर्यटनक्षेत्रांच्या परिसरात बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांची मागणी असल्यास काही मार्गावर आरामदायी आणि वातानुकुलित बसेसही सोडण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षी उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात येतात. या जादा बसेससाठी महामंडळाच्या वतीने जादा भाडे आकारण्यात येत असते. त्यातून महामंडळाला आतापर्यंत अपेक्षेपेक्षाही अधिक महसूल मिळत असतो. मात्र, यावर्षीचा दुष्काळ लक्षात घेऊन या भाड्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. असे असले तरी अपेक्षित महसूल मिळेल, असा महामंडळाला विश्‍वास आहे.

त्यामुळेच ही तूट भरून काढण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जादा बसेस सोडण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कोकण, महाबळेश्‍वर तसेच अन्य ठिकाणच्या पर्यटनाच्या ठिकाणी या बसेस सोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात या मार्गावर साध्या बसेस सोडण्यात येणार आहेत. मात्र, प्रवाशांची मागणी असल्यास त्या मार्गावर आरामदायी आणि वातानुकुलित बसेस सोडण्याचीही महामंडळाची तयारी आहे असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.