युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या स्टुडिओची निर्मिती
‘गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये’ “सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्कार
पुणे – सामाजिक संदेश देणाऱ्या “पुनरागमनाय च’ आणि “आशेची रोषणाई’ या लघुपटांचा 7 व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आला. यामध्ये “पुनरागमनाय च’ या लघुपटासाठी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांना
“सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ आणि “आशेची रोषणाई’ या लघुपटाला “सर्वोत्कृष्ट माहितीपट’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या पुनीत बालन स्टुडिओजची निर्मिती असणाऱ्या “पुनरागमनाय च’ आणि “आशेची रोषणाई’ या लघुपटांचा सन्मान नुकत्याच पार पाडलेल्या 7 व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. महेश लिमये यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेल्या “पुनरागमनाय च’ लघुपटात करोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळा ठरलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचे उत्कट चित्रण पाहायला मिळत आहे. याची संकल्पना निर्माते पुनीत बालन यांची आहे.
तर सर्वोत्कृष्ट माहितीपट “आशेची रोषणाई’ या लघुपटात निर्माते बालन यांनी “आज करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, लॉकडाउनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे, त्या घटकांच्या आयुष्यात आनंद पसरवूया’ ही सामाजिक संदेश देणारी संकल्पना मांडली. यात अभिनेता रितेश आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनीही सहभाग घेतला आहे.
करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आम्ही “बाप्पांचं घरीच विसर्जन … सुरक्षित विसर्जन’, “पुनरागमनाय च’ आणि “आशेची रोषणाई’ या तीन शॉर्टफिल्ममधून सामाजिक संदेश दिला. या तिन्ही शॉर्टफिल्मला सोशल मीडियावर पुण्यासह जगभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारप्राप्त दोन्ही शॉर्टफिल्मचे लेखन क्षीतिज पटवर्धन यांनी केले असून, क्रिएटिव्ह इनपुट्स विनोद सातव यांचे आहेत. आमची निर्मिती असलेल्या या शॉर्टफिल्मला सोशल मीडियावर रसिकांची आणि पुरस्कारांच्या रूपात समीक्षकांची मिळालेली दाद ही आम्हाला प्रेरणा देणारी आहे.
– पुनीत बालन, निर्माते तथा उद्योजक