सातारा -रस्त्याकडेला असलेल्या झाडांची तोड नियमापेक्षा जास्त केल्याबद्दल कारवाई न करण्यासाठी वखार व्यावसायिकाकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी बाळू बाबुराव वाघ (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर-विटा या रस्त्याचे काम सुरू असून या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचा ठेका एक वखार व्यावसायिकाला देण्यात आला आहे. त्यानुसार त्याचे कामगार झाडे तोडत असताना अटी व शर्तींपेक्षा जास्त झाडांची तोड करण्यात आली होती. त्यावर कारवाई न करण्याबाबत वाघ याने तक्रारदाराकडे पंचवीस हजारांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी करून पोलिसांनी रहिमतपूर येथे सापळा लावला. त्यावेळी वाघ या तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.