हडपसर – जालना येथे अंतरवाली सराटी मध्ये मराठा समाजाच्या मोर्चाच्या वेळी घडलेला हिंसाचार चिंताजनक आहे. या घटनेच्या निषेधार्थ हडपसर येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा तसेच परिसरातील नागरिक यांच्या वतीने हडपसर गांधी चौक ते गाडीतळ अशी रॅली काढून मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा दर्शविण्यात आला. तसेच आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज चा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी आमदार चेतन तुपे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र बनकर, महेश टेळे, संदीप लहाने, दिलीप तुपे, मंदा नलावडे, डॉ. शंतनू जगदाळे, वैष्णवी सातव, सविता मोरे, दिलीप गायकवाड, निलेश काळे, सागरराजे भोसले, हनुमंत मोटे, सचिन मोरे, दिपाली कवडे, संजय शिंदे, विजय देशमुख, अमोल हरपळे यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी आम्ही न्याय मार्गाने लढा देऊन ते मिळविल्याशिवाय राहणार नाही. तसेच, माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेच पाहिजे, राज्यकर्ते मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहात नाही, शांततेने सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळेच आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. सूत्रसंचलन अनिल मोरे यांनी केले. तर विशाल लहाने यांनी आभार मानले.
“मराठा समाजाच्या रास्त मागण्यासाठी शांतता मार्गाने सुरू असणाऱ्या आंदोलनस्थळी आंदोलकांवर लाठीचार्ज करणे अमानुष आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांना दुखापत झाली आहे. अशाप्रकारे लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या सरकारचा निषेध आहे.’
– चेतन तुपे (आमदार, हडपसर विधानसभा)