मुंबई – ‘जवान’ पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये तुफान कमाई करत आहे. चित्रपटाची बंपर ऍडव्हान्स बुकिंग झाली होती आणि आता जवानच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे ट्रेंडही येऊ लागले आहेत, त्यानुसार शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटात प्रेक्षकांना साऊथचा तडका, बॉलिवूडचा मसाला बघायला मिळतो आहे.
जवान सर्व भाषांमध्ये रिलीज झाला असून, चित्रपटाने 75 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर जवानने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने जवळपास 120 कोटींची कमाई केली आहे. हे सुरुवातीचे ट्रेंड असले तरी अधिकृत आकडे आल्यावर हा आकडा बदलू शकतो.
यादरम्यान ‘जवान’ चित्रपटासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट ऑनलाइन साइट्सवर लीक झाल्याचं कळतंय. एचडी प्रिंटमध्ये सिनेमा ऑनलाइन लीक झाला असून, हा निर्मात्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रदर्शनाच्या काही तासांतच ‘जवान’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.
हा चित्रपट तमिळ रॉकर्स, एमपी फोर मुव्हीज, वेगा मूव्हीज आणि फिल्मीझिला या साइट्सवर फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मातांना कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शाहरुखचा चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याचा पठाण हा चित्रपटसुद्धा ऑनलाइन लीक झाला होता.