पुणे – कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी, असे आदेश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.
कृषिपंप वगळून नवीन वीजजोडण्या देण्यासाठी नवीन सेवा जोडणी, नॉन डीडीएफ ग्राहक योगदान व परतावा तसेच समर्पित वितरण सुविधा, अशा तीन योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी नवीन सेवा जोडणी योजना अतिशय महत्वाची आहे. या योजने अंतर्गत नवीन वीजजोडणी देणे किंवा वीज भार कमी अधिक करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधांची व यंत्रणेची कामे महावितरणकडून करण्यात येतील. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. तर केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच या पायाभूत वीजयंत्रणेची कामे करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. क्षेत्रीय कार्यालयांनी वीजखांब, वितरण रोहीत्र, स्विच गिअर्स, वीजवाहिन्यांसह आवश्यक साधनसामग्री आपापल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध ठेवावी तसेच ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेमध्ये वीज भार वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची कामे सुद्धा अंतर्भूत करण्यात आली आहेत.
माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार
मात्र, राज्यात काही ठिकाणी नवीन सेवा जोडणीच्या पर्यायाची माहिती ग्राहकांना देण्यात येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची महावितरणने गंभीर दखल घेत नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा ग्राहकांना सर्वप्रथम पर्याय देण्यात यावा, असे सक्त निर्देश देण्यात आले आहे.