पुणे – महापालिकेकडून अवघ्या महिन्याभरापूर्वीच शहरात कोणत्याही प्रकारची खोदाई करायची झाल्यास खोदाई काम करणाऱ्या यंत्रणा आणि पथ विभागात समन्वय ठेवला जाईल तसेच नव्याने केलेल्या रस्त्यावर अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेशिवाय खोदाईस परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महिन्याभराच्या आत पालिकेच्या पथ विभागाला आपल्या निर्णयाचा विसर पडला आहे.
सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिर ते पेरुगेट पर्यंतच्या रस्त्यावर अवघ्या तीन दिवसांत महावितरणकडून खोदाई करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. क्षेत्रीय कार्यालयाने मार्च अखेरीस निधी खर्ची पाडण्यासाठी घाई गडबडीने दि. ११ मार्चला या रस्त्याचे डांबरीकरण केले तर पालिकेच्या मुख्य खात्याने महावितरणला १५ मार्चपासून खोदाईची परवानगी देऊन टाकली. त्यानंतर, दि. २२ मार्चला हा रस्ता खोदण्यात आला आहे. परिणामी, नवा कोरा समन्वया अभावी खोदण्यात आला असून त्याचे पैसे वाया गेले आहेत.
संंवाद साधण्याची तसदीही नाही…
महापालिकेच्या १२ मीटरच्या आतील रस्त्याची देखभाल दुरूस्ती पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते तर १२ मीटरच्या वरील रस्त्यांची जबाबदारी पालिकेच्या मुख्य पथ विभागाकडे असते, मात्र, खोदाईची परवानगी मुख्य खाते देते. ही परवानगी देताना लहान रस्त्यांचा कोणताही विचार केला जात नाही.
प्रत्यक्षात या दोन्ही विभागात समन्वय असणे आवश्यक असताना क्षेत्रीय कार्यालय आणि पथ विभाग एकमेकांशी संंवाद साधण्याची तसदीही घेत नाहीत. हाच प्रकार या रस्त्याबाबत घडला क्षेत्रीय कार्यालयाने नुकतेच काम केले असल्याची माहिती पथ विभागास नसल्याने त्यांनी खोदाईस परवानगी दिली तसेच महावितरणने लगेचच तो खोदण्याचे कर्तव्य पार पाडले.
महावितरणला कशाची घाई ?
जे खोदकाम संध्याकाळी महावितरण कंपनीने केले. महावितरणचे काम अर्जंट नव्हते तर त्यांच्या नियमित कामाचा भाग म्हणून हे काम करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाची .रितसर परवानगी घेऊन त्यांनी काम सुरु केल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या पथ विभागाच्या रस्ते खोदाई परवानगी देणारे अधिकारी व डांबरीकरण करणारे अधिकारी यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याने हे प्रकार घडत असून तातडीने हे प्रकार न थांबविल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे या प्रकरणाची तक्रारही करण्यात आली आहे.