पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील विविध भागांत आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार प्रचारानिमित्त जात आहेत. त्यावेळी काहीजण दोघांना घेराव घालून दडपशाही करत आहे. रोहित आणि युगेंद्र पवार यांना तातडीने सुरक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुळे यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना निवेदन दिले आहे. लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त रोहित आणि युगेंद्र पवार जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जात आहेत. लोकशाही मार्गाने ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी दडपशाहीचे प्रकार घडले आहेत.
काही जण त्यांना घेराव घालून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या घटना लोकशाहीच्या गळा घोटणाऱ्या आहेत. अशा घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडणे चुकीचे आहेत, असे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे.