पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कार उलटून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. अथर्व भाऊसाहेब जगताप ( २२, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या मोटारचालक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आदेश संदेश कदम यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अथर्व हा मध्यरात्री एकच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून भरधाव निघाला होता. पाषाणमधील सुतारवाडी परिसरात त्याची कार उलटली. मोटारीसकट तो महामार्गावरून सेवा रस्त्यावर पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करत आहेत.
कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
कारच्या धडकेत दुचाकीस्वार चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना थेऊर फाटा येथे घडली. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास रामदास धुमाळ (४०,रा. कुंजीरवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश धुमाळ (४३) यांनी तक्रार दिली आहे.
विकास यांच्या दुचाकीस भरधाव कारने धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करत आहेत.