नगर -दलित महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, नामदेव चांदणे विशाल भालेराव, कडूबाबा लोंडे, रफिक शेख, दीपक गायकवाड, शशिकांत वाकचौरे, विशाल विधाते आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागासवर्गीयांच्या विकासासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी तसेच आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक व प्रशिक्षण संस्थेत शासनाने ज्या सामाजिक न्यायाच्या उद्देशाने सुरू केलेले आहे. त्याचा उद्देश अद्यापि सफल झालेला नाही. अनुसूचीत जाती-जमातीमधील मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या प्रमाणात संधीच देण्यात आलेली नाही. या संस्थेचा मागासवर्गीयांना लाभ होत नाही. महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व 58 जातीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. त्याचा देखील काहीच उपयोग होत नसल्याचा दावाही महासंघाने केला.