पेठ -येथे एका 56 वर्षीय व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे तब्बल दीड महिना करोनामुक्त असलेल्या पेठ (ता. आंबेगाव) गावात पुन्हा करोनाने शिरकाव केला आहे. या परिसरातील सहाही गावांत त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी
(दि. 22) तहसीलदार रमा जोशी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतमध्ये बैठक झाली. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत गावातील बॅंका, पतसंस्था, दुकाने, हॉटेल व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असून दवाखाने व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
पेठ गाव आंबेगाव तालुक्याचे प्रवेशद्वार असल्याने व सातगाव पठार भागातील सात गावांची मुख्य बाजारपेठ असल्याने गुरुवार (दि. 23) पासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच अनिल सणस यांनी दिली. या दरम्यान दूध उत्पादन शेतकरी यांचे नुकसान होऊ नये यासाठी सकाळी 7 च्या आत डेअरीत दूध आणून देताना सोशल डिस्टन्स ठेऊन घ्यावे. कृषी सेवा केंद्र सुरू राहतील.
गावात बिगर मास्क फिरताना आढळल्यास 500 रु दंड व कायदेशीर कारवाई केली जाईल. गावातील मुख्य रस्ता वगळता सर्व अंतर्गत रस्ते सील करण्यात येणार असल्याचे प्रशानसनाने सांगितले आहे. येथे 29 मे दरम्यान 2 रुग्ण आणि 2 जुलैला 4 रुग्णांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.
मात्र, या सहाही रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली होती, त्यामुळे पेठ गाव करोनामुक्त झाले होते. पेठ गावात आणि सातगाव येथील ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी चांगले प्रयत्न करत तब्बल दीड महिना करोनामुक्तीसाठी प्रबोधन करत गावाला करोनामुक्त ठेवले होते.
मात्र, आज (दि. 22) एका 56 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता पुन्हा एकदा खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाने करोना चाचणी खासगी दवाखन्यामध्ये करून घेतली होती. या रुग्णास मंचर येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.