पिंपरी – गेल्या दोन वर्षांत शहरातील मालमत्ता धारकांना घर बसल्या उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात महापालिका प्रयत्नशील राहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जानेवारीपासून अॅसेसमेंट रजिस्टर ऑनलाइन करण्यात आले आहे. यापुढे एक जानेवारीपासून होणाऱ्या सर्व नोंदी फक्त ऑनलाईन केल्या जाणार आहेत. एक जानेवारीपासून मिळकत कर उतारा ऑनलाईन काढता येणार आहे. कारण, कर संकलन विभागाच्या सर्व सुविधा ऑफलाईन करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या ६ लाख १५ हजार विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांना कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत कराची आकारणी व वसूलीची कार्यवाही करण्यात येते. यासाठी १७ विभागीय करसंकलन कार्यालये कार्यरत आहेत. मालमत्ता धारकांना विविध शासकीय कामांसाठी मालमत्ता कर उतारा लागतो. हा उतारा काढण्यासाठी यापूर्वी नागरिकांना प्रत्यक्ष कर संकलन कार्यालयात जावे लागायचे. त्यानंतर मालमत्ता आकारणी पुस्तकात उतारे शोधावे लागत होते. त्यानंतर हा उतारा हस्तलिखित स्वरूपात दिला जात होता. यासाठी विलंब लागत होता. आता १ जानेवारीपासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. १ जानेवारीनंतर ज्यांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. त्यांना तो उतारा तत्काळ मिळेल. यासाठी नाममात्र असे २० रूपये शुल्क भरावे लागणार आहे.
३१ डिसेंबर २०२३ पूर्वीच्या नोंदी नोंद वहीमध्ये नोंदविलेल्या असल्यामुळे संबंधित मालमत्ता धारकांना मालमत्ता उतारा या टॅबवर क्लिक केले की त्याचा तपशील संबंधित झोन कार्यालयाकडे वर्ग केला जाईल. त्यानंतर संबंधित गट लिपीक असेसमेंट रजिस्टरमधील त्या मालमत्तेच्या नोंदी काॅम्प्युटरमध्ये फिड करतील. त्यानंतर संबंधित मालमत्ता धारकांच्या ई-मेल आणि मोबाईलवर लिंक पाठविण्यात येईल. या लिंकवर क्लिक केले की दाखला मिळेल. अथवा महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखला मिळेल. त्यामुळे १ जानेवारीपासून ऑफलाईन सुविधा बंद करण्यात येणार आहे.
असा मिळेल मिळकत कर उतारा
महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन कर आकारणी व कर संकलन विभागाचा पर्याय निवडावा. यामध्ये मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाकला की त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील. मालमत्ता कर उतारा हा पर्याय निवडावा. त्यानंतर फक्त क्लिक करा आणि मालमत्ता कर उतारा मिळवा. ही प्रक्रिया ओटीपी आधारित असल्याने नागरिकांना त्यांच्या मालमत्तेला आपला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागणार आहे. आतापर्यंत जवळपास साडे चार लाख मालमत्तांना मोबाईल नंबर लिंक केलेले आहेत. उर्वरित मालमत्ता धारक यांनीही आपले मोबाईल नंबर आपल्या मालमत्तेला लिंक करण्याचे पालिकेने आवाहन केले आहे.
आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या (१) मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग हायटेक करण्याचे काम वेगाने चालू आहे. विभाग आधुनिक करत असताना त्याचा अंतिम फायदा मालमत्ता धारकांना होणे, त्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमच्या कुठल्याही उपक्रमाचा केंद्रबिंदू हा अंतिमतः शहरातील नागरिक राहील, याची आम्ही दक्षता घेत आहोत.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग