करवाढीला विरोधकांसह नागरिकांचाही तीव्र विरोध
पिंपरी – शहरातील 2007 पूर्वीच्या सर्व मालमत्तांच्या करात अडीचपटीने वाढ केली जाणार आहे. शहरात 2007 पूर्वीच्या तब्बल दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करात एकाचवेळी अडीचपटीने करवाढ केली जाणार आहे. या करवाढीला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने विरोध दर्शविला आहे. अडीच पटीने करवाढ करणे चुकीचे आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला 5 लाख 25 हजार मिळकती आहेत. त्यापैकी 2007 पूर्वीच्या दोन लाख 32 हजार मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी एक लाख 89 हजार, बिगरनिवासी 26 हजार, मिश्र 8 हजार 500, औद्योगिक चार हजार आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते.
जुन्या आणि नवीन मालमत्तांच्या करामध्ये मोठी तफावत आहे. त्यात सुसूत्रता आणण्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्पात शहरातील 2007 पूर्वीच्या दोन लाख 32 हजार मालमत्तांच्या करात तब्बल अडीचपटीने वाढ सुचविली आहे. तसेच महासभेने करवाढ फेटाळली. तर, करवाढ करण्याचे आपल्याला अधिकार असल्याचे सांगत करवाढ करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जुन्या मालमत्तांच्या करात मोठी वाढ होणार आहे. एकाचवेळी एवढी मोठी करवाढ सुचविल्याने जुन्या मालमत्ताधारकांमध्ये नाराजी भावना आहे.
या करवाढीला नागरिकांनी देखील विरोध दर्शविला आहे. शहरातील 15 वर्षापूर्वीच्या मालमत्ताकरात वाढ करणे चुकीचे आहे. अडीचपटीने वाढ करुन नागरिकांवर भुर्दंड दिला जात आहे. महासभेने करवाढ फेटाळावी. अशी मागणी करण्यात येत आहे. करवाढ लागू केल्यास मालमत्ताधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशाराही विरोधकांनी दिला आहे.