तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील मोबाइल टाँवर व नँशनल हेवी इंजिनिअरींग कंपनी यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कराच्या मोठ्या थकबाकीमुळे कर वसुलीचे प्रमाण घटत आहे. कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी दिला आहे. रविवार (दि. ३१) अखेर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीसाठी कारवाईचा धडाका लावला होता.
त्यामुळे ३२ कोटी ९५ लाख वसुलीचे उद्दिष्ट असताना केवळ १७ कोटी ४० लाख रुपये वसूल झाले. तसेच पाणी पट्टीचे ९ कोटी ४ लाख वसुलीचे उद्दिष्ट असताना ४ कोटी ७० लाख वसूल करण्यात यश आले आहे. आत्तापर्यत वसुलीसाठी ४१ मिळकतीवर जप्तीची कारवाई केली होती.
त्याध्ये १० मालमत्ता धारकांनी थकबाकी भरली आहे. तसेच ७ नळ कनेक्शन खंडित करण्यात आले होते. त्यामध्ये १ मालमत्ता धारकांनी थकबाकी भरली आहे. त्यामुळे ६ नळ कनेक्शन खंडित तर ३१ मालमत्तावर जप्तीची कारवाई झाली आसल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे शहरात ३७ हजार ७५६ मालमत्ताधारक आहेत. नगरपरिषदेला पाणी पट्टी व मालमत्ता करापोटी एकूण २२ कोटी १० लाख रुपये वसूल झाले आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे एन.के.पाटील, उपमुख्य अधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक विजय शहाणे मिळकतकर व्यवस्थापक जयंत मदने यांच्यासह बारा विभागातील अधिकारी व कर्मचारी वसण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील घरोघरी जात होते.