प्रॉपर्टी बाजारात सुधारणांचे वारे

दीर्घकाळानंतर प्रॉपर्टी बाजारात सुधारणांचे वारे वाहत आहेत. देशातील नऊ मोठ्या शहरात जानेवारी ते मार्च या महिन्यात घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. ही संख्या 56,146 युनिट राहिली आहे. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक आहे. रिअल इस्टेट शोध आणि विश्‍लेषण कंपनी प्रॉपइक्विटीच्या अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे.

काही वर्षांपासून रिअल इस्टेट बाजारात सुस्तीचे वातावरण पाहावयास मिळत होते. त्यानंतर जीएसटी, रेरा कायदा आणि नोटाबंदी यामुळे रिअल इस्टेटचा बाजार आणखीच मंदावला. अर्थात, परवडणाऱ्या घराने या क्षेत्राला संजीवनी दिली असली तरी अजून त्यापासून घसघशीत लाभ या क्षेत्राला झालेला नाही. अर्थात, सामान्यांना घर खरेदी करणे सोपे झाले आहे. आता पुन्हा रिअल इस्टेटमध्ये खरेदी-विक्रीच्या हालचाली दिसत आहेत. प्रॉपइक्विटीच्या अहवालानुसार घराच्या विक्रीत वाढ होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे रेडी पझेशन घराच्या विक्रीत झालेली वाढ होय. अर्थात, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, कोलकाता, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, ठाणे आणि चेन्नईत अर्थात नवीन घराचे लॉचिंग होण्याचे प्रमाण हे गेल्यावर्षीच्या तुलनेत 2019 मध्ये 7 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. ते आता 42,504 युनिट झाले आहे. भारतीय रिअल इस्टेटचा बाजार हा आता गुंतवणूकदारांसाठी नाही तर राहणाऱ्यांसाठी झाला आहे. तयार घरांना ग्राहक प्राधान्य देत आहेत. बांधकाम अवस्थेतील घरे वेळेवर ताब्यात न मिळाल्याने ग्राहक रेडी पझेशनकडे वळत आहेत. तसेच तयार घरात जोखीमही कमी असल्याने ग्राहक नव्या प्रकल्पाकडे पाठ फिरवत आहेत.

तीन शहरात विक्री घसरली
घरांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी हैदराबाद, गुरुग्राम, कोलकता येथे घसरण झाली आहे. त्याचवेळी पुण्यात घरांची विक्री 32 टक्के राहिली आणि ती देशातील सर्वाधिक आहे. बंगळुरू आणि मुंबईत घराची विक्री अनुक्रमे पाच आणि 12 टक्‍क्‍यांनी वाढली. त्याचवेळी नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये 19 टक्के वाढ नोंदली गेली. आगामी काळात घराची मागणी वाढत चालल्याने तेजी येण्याची शक्‍यता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

निधीअभावी प्रकल्प रेंगाळले
ऍनरॉकच्या अहवालानुसार देशातील सात प्रमुख शहरात 4, 51, 750 कोटी रुपयांचे सुमारे 5.6 लाख निवासी प्रकल्पांचे बांधकाम हे मुदतीच्या मागे पडत आहेत. मागणीतील घसरण आणि विकासकाकडून निधीचा अन्य ठिकाणी होणारा वापर यामुळे गृहप्रकल्पात पैशाची चणचण जाणवत आहे आणि योजना लटकल्या आहेत. सर्वाधिक गृहप्रकल्प एनसीआरमध्ये अडकले आहेत. या ठिकाणी दोन लाखांहून अधिक घरांचे बांधकाम रेंगाळले आहेत.

न विकलेल्या घरांची संख्या कमी
देशातील घराच्या विक्रीत वाढ झाल्याने न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येत घट झाली आहे. अहवालानुसार डिसेंबर 2018 पर्यंत देशात न विकलेल्या घरांची संख्या 6.16 लाख युनिट होती. ती आता 5,91 लाख राहिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.