पुणे – यंदा प्रथम वर्षाचे अध्यापन 1 सप्टेंबरपासून, तर इतर सर्व वर्षांचे अध्यापन 1 ऑगस्टपासून ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापूर्वी शिक्षकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी. करोनानंतर सुरू होणाऱ्या शिक्षणाची प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यासाठी महाविद्यालय अथवा संस्थांनी सुस्पष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे यंदाचे शैक्षणिक वर्ष दि.1 सप्टेंबरपासून सुरू केले जाणार आहे. त्यापूर्वी शिक्षकांनी ई-कंटेट, नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी जूनअखेरीस आणि जुलैमध्ये करणे आवश्यक आहे. अशा संयुक्त पद्धतीने शिकवण्याची तयारी करताना महाविद्यालयांना पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसाठी मुडल अथवा गुगल, क्लास रूम अथवा ई-लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करून शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागेल. त्यासाठी आराखडा तयार करून त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. दि. 1 ऑगस्टपूर्वी त्याची चाचपणी करून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समजून घ्याव्यात.