सातारा (प्रतिनिधी) – सातारा येथील खाजगी रुग्णालयात न्युमोनियावर उपचार सुरू असलेल्या राजापुरी (ता. सातारा) येथील 71 वर्षांच्या पुरुषाचा काल (दि. 13) रात्री मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्याच्या घशातील स्राव तपासणीकरिता खाजगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यात तो करोनाबाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने रविवारी कळविले. हा रुग्ण गेल्या महिन्यात मुंबईवरून आला होता. त्याचबरोबर सातारा येथील खाजगी रुग्णालयातून खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या 23 वर्षांच्या गरोदर महिलेच्या घशातील स्रावाच्या नमुन्याचा अहवाल आला असून ती करोनाबाधित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी आणखी आठ जण करोनाबाधित असल्याचे रात्री उशिरा आलेल्या अहवालांवरून स्पष्ट झाले आहे, तर नऊ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या आठ नागरिकांचे रिपोर्ट काल (दि. 13) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. कोडोली (ता. सातारा) येथील 42 वर्षांचा पुरुष, 17 व 14 वर्षे वयाच्या दोन मुली, लोणंद (आनंदगाव), ता. खंडाळा येथील 38 वर्षांची महिला, शेलारवाडी, ता. वाई येथील 57 वर्षांचा पुरुष, बावधन नाका (वाई) येथील 25 वर्षांचा युवक, तुळसण, ता. कराड येथील 60 वर्षांचा वृद्ध, महाबळेश्वर तालुक्यातील बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला मूळचा चेंबूर (मुंबई) येथील 51 वर्षांचा पुरुष यांना करोनाची बाधा झाली आहे.
एकूण नऊ जण करोनामुक्त
मायणीतील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असलेल्या खटाव तालुक्यातील पाचवड येथील 56 वर्षांचा पुरुष, वांझोळीतील 52 वर्षांचा पुरुष, पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्यांपैकी कासवंड गोळेवाडी (ता. महाबळेश्वर) येथील 36, 62 वर्षांच्या महिला व 12 वर्षांची मुलगी, पार्ले येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असलेल्यांपैकी वानरवाडी (ता. कराड) येथील 70 वर्षांची महिला व 17 वर्षांची युवती, म्हसवड कोव्हिड सेंटरमध्ये दाखल असलेल्यांपैकी दहिवडी (ता. माण) येथील 17 वर्षांचा युवक, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी निढळ (ता. खटाव) येथील 23 वर्षांची महिला, अशा नऊ जणांना दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
35 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 16, शिरवळ येथील 13 व पानमळेवाडी येथील सहा, अशा एकूण 35 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे येथील एनसीसीएसकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 728 झाली असून 508 बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 188 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे.