पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, तरी शहरातील विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा नवनियुक्त महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. मात्र, राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
त्यात पुणे महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्त आणि एक उपायुक्तांचा समावेश आहे. तर आणखी तीन उपायुक्तांची पुढील दोन दिवसांत बदली निश्चित आहे. याचा फटका महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाला बसण्याची भीती आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वीच तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, शासनाकडून त्यास दिरंगाई केली जात होती. त्यामुळे निवडणूक आयोगानेच अधिकारी बदली करण्यास सुरूवात केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाकडून अधिकारी बदलीचे आदेश काढण्यास सुरूवात केली आहे. त्यात मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.
या शिवाय उपायुक्त प्रसाद काटकर यांचीही बदली करण्यात आली. तर पुढील दोन दिवसांत उपायुक्त आशा राऊत, संतोष वारूळे तसेच निवडणूक विभाग प्रमुख चेतना केरूरे यांच्याही बदलीचे आदेश निघण्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेत एकाच वेळी शहराचा कारभार पाहणारे जवळपास सहा अधिकारी बदली होणार आहेत. तर, काही दिवसांपूर्वी उपायुक्त सचिन इथापे आणि अजित देशमुख यांचीही बदली झालेली आहे.
ढाकणेंची बदली रद्द करण्याची मागणी
राज्यशासनाने काढलेल्या बदली आदेशात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. ढाकणे हे महापालिकेत १४ महिन्यांपूर्वी रुजू झाले आहेत. त्यामुळे, त्यांना तीन वर्षे पूर्ण झालेले नसल्याने त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या कनिज सुखरानी, माजी नगरसेवक उज्वल केसकर यांंनी शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
तर ढाकणे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी केशवनगर- मुंढवा भागातील नागरिकांनी महापालिकेत आंदोलनही केले. ढाकणे यांनी गेल्या १४ महिन्यांत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासह, शाळांची सुधारणा, नाट्यगृहांची सुधारणा, अतिक्रमणे हटवणे, रस्त्यांचे रुंदीकरण असे अनेक प्रश्न सामोपचाराने मार्गी लावले आहेत. पण, चुकीच्या पद्धतीने त्यांची बदली झाभील्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.