पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात पावसाळ्यापूर्वीच्या कामांची लगबग सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठ्या आकाराच्या ड्रेनेज वाहिन्या तसेच पावसाळी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे रडतखडत सुरू असल्याने अनेक भागात रस्ते खोदण्यात आले आहेत. याचा फटका वाहतुकीला बसला असून, अनेक मुख्य रस्त्यांवर ही खोदाई सुरू आहे. तर खोदाईच्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न करता कामे तसेच सोडली जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.
मनपा पथ विभागाकडून शहरात वेगवेगळ्या भागांत पूरस्थिती रोखण्यासाठी नव्याने पावसाळी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील वर्षी पाणी साठलेल्या अनेक भागांत पालिकेकडून काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत.
त्याचा राडारोडाही रस्त्यावरच पडलेला आहे. परिणामी, ज्या-ज्या भागांत खोदाई सुरू आहे, त्या-त्या भागांत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खडी- माती असल्याने वाहने घसरत आहेत. शिवाय, सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.
खोदाई नियमांचे उल्लंघन
कोणत्या कामासाठी खोदाई केली जात आहे? जबाबदार ठेकेदार तसेच अधिकाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक, काम कधी सुरू केले आणि कधी संपणार? याच्या माहितीसह कामामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी संबंधित ठिकाणी वाॅर्डन नेमण्याच्या सूचना महापालिकेने या पूर्वीच ठेकेदारांना दिल्या आहेत. मात्र, अशी सूचना अथवा माहिती कोठेही लावण्यात आलेली नाही. त्याचे परिणाम मात्र पुणेकरांना भोगावे लागत आहेत.
सुरू असलेल्या कामांचा तातडीने आढावा घेऊन कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले जातील. तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. – अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग, महापालिका