बॉलीवूडमध्ये मध्यंतरीच्या काळात गाजलेल्या लग्नांपैकी एक म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा विवाह. परदेशात राहणाऱ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध गायक असलेल्या निकशी लग्न केल्यानंतर प्रियांका चांगलीच चर्चेत आली. बॉलीवूडमधील नायिकांची अफेअर्स जितक्या प्रमाणात चर्चिली जातात तितकीच त्यांच्या विवाहोत्तर जीवनाचीही चर्चा होत असते.
प्रियांकाही त्याला अपवाद नाही. लग्नानंतरही प्रियांकाच्या खासगी आयुष्यात काय चाललंय याविषयीची उत्सुकता तिच्या चाहत्यांसह अनेकांना असतेच. अशा उत्सुकांसाठी एक खास बातमी आहे. ती म्हणजे निक आणि प्रियांकामध्ये सध्या नाराजी नाट्य सुरु आहे. आता तुम्ही म्हणाल की, वैवाहिक आयुष्यात नाराजीनाट्य नसलेलं जगाच्या पाठीवर एक तरी कुटुंब आहे का? पण मंडळी, निक-प्रियांकामधील या नाट्याचं वेगळेपण समजून घ्या.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये निक जोनसने एका प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगितलं की, प्रियांका त्याच्यावर नेहमी नाराज असते. या नाराजीचं कारण विचारलं असता निक म्हणाला की त्याच्या जीनो नामक कुत्रोबांवरुन प्रियांका नाराज आहे.
या जीनोचे इन्स्टाग्रामवर प्रियांकाची डॉगी डायनापेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत म्हणे! डायना गेल्या दीड वर्षांपासून इन्स्टाग्रामवर असून तिचे आतापर्यंत केवळ 148 हजार फॉलोअर्स आहेत; पण अवघ्या महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर दाखल झालेल्या जीनोच 330 हजार फॉलोअर्स झाले आहेत!