मुंबई – सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र,महाकाल मंदिरात रणबीर-आलियाला बंदी,उज्जैनमध्ये सुरू असलेला निदर्शने यावरून अनेक गोष्टी ट्रेंड होताहेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या चित्रपटाविरोधातील द्वेषपूर्ण राजकारणावर भाष्य केलं आहे. चतुर्वेदी यांनी आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचा जुना फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करताना खासदार चतुर्वेदी यांनी लिहिले की, “तुम्ही द्वेष पूर्ण वातावरणामध्ये गप्प प्रेक्षक बनून राहिल्यास हे फोटो सेशन तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला वाटत राजकारणावर बोलणे तुमचे काम नाही. तर ते तुमच्या मागे येतील. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराविरोधातील आंदोलन हे त्याचे उदाहरण आहे. राजकीय पक्षपातीपणा अशा कुरूपतेला जन्म देत आहे याची लाज वाटते.”
त्या पुढे लिहितात, ‘प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचा हा निवडक विरोध म्हणजे एक इंडस्ट्री आणि लॉबी बनली आहे, जर एकत्रितपणे याला मागे ढकलले नाही तर आपण वेगाने द्वेष, भीती आणि शांततेच्या खाईत जाऊ. मनोरंजन उद्योग हा रोजगार निर्माण करणारा आहे, लाखो लोक त्यावर अवलंबून आहेत. तर बोल!’
This selective protest before every movie release has become an industry& a lobby, if not collectively pushed back we are fast heading into an abyss of hate,fear& silence. The entertainment industry is an employment generator, lakhs depend on it. Speak up. https://t.co/tLpybJ7JjF
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) September 7, 2022
काय आहे नेमकं प्रकरण
बॉलीवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी संध्याकाळी महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. पण त्यांना दर्शन न घेताच मंदिरातून परतावे लागले. केवळ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी बाबा महाकालच्या दर्शनासाठी पुढे जाऊ शकले. खरं तर, आलिया-रणबीर आणि अयान मुखर्जीच्या आगमनापूर्वीच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाकाल मंदिराच्या मुख्य आणि व्हीव्हीआयपी गेटवर गोंधळ घातला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, रणबीर कपूरने स्वत: बीफ खातो असे सांगितले आहे. अशा परिस्थितीत गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात प्रवेश कसा दिला जातो, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल असा जाब विचारात विरोधकांनी गोधळ घातला होता.