मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी आता आंध्र प्रदेशातील एका खासदाराच्या खासगी सचिवाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. अमित शहा यांनी मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यात सोमवार, ५ सप्टेंबर रोजी शहरातील मुख्य गणेश मंडळ लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते.
दरम्यान, खासदाराच्या खाजगी सचिवावर आरोप आहे की,’त्याने स्वःताला गृह मंत्रालयाशी संलग्न सुरक्षा अधिकारी असे सांगितले, तसेच त्यांच्या भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. हेमंत पवार असे आरोपी खासगी सचिवाचे नाव आहे.
या प्रकरणातील फिर्यादीनुसार, सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) नीलकांत पाटील, सोमवारी गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर असताना गिरगावात पोलिस बंदोबस्ताची देखरेख करत असताना ही घटना घडली.
एसीपी पाटील यांच्या म्हणण्यानुसार,’ते गृहमंत्र्यांच्या ताफ्याच्या मार्गावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्यांवर लक्ष ठेवून होते, तेथून गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार होते. पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, हेमंत पवार हे पांढरा शर्ट आणि निळा ब्लेझर परिधान करून दुपारी १२.१५ च्या सुमारास गृहमंत्री शहा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पाहिले.’
पाटील पुढे म्हणाले,’ हेमंत पवारने गृह मंत्रालयाचे ओळखपत्र घातले होते. याशिवाय तो प्रतिबंधित भागात फिरताना आढळून आला. इतकेच नाही तर काही तासांनंतर एसीपी पाटील यांनी हेमंत पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर पाहिले. तक्रारीत म्हटले आहे की, ‘चौकशीत त्याने केंद्र सरकारच्या एजन्सीचा सदस्य असल्याचा दावा केला.’
पोलिसांनी सांगितले की, हेमंत पवारवर आयपीसीच्या कलम 170 (लोकसेवक अधिकारी म्हणून सादर करणे) आणि 171 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक सेवक म्हणून ओळखपत्र परिधान करणे) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर पवारला गिरगाव न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.