परिंचे, (वार्ताहर) – श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तींना मानकरी राऊत मंडळींच्या हस्ते हळद लावून मंडवळी बांधून यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो महिला भाविक उपस्थित होत्या. यात्रा उत्सवानिमित्त मंदिरास फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच यात्रेची तयारी पूर्ण झाल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले आहे.
पहाटे पाच वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आले. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दुपारी ३ वाजता राऊतवाडी येथून देवाचे मानकरी समस्त राऊत मंडळी देऊळवाड्यात आले. वाजत गाजत देवाची हळद व मंडवळ्या मंदिरात आणण्यात आल्या. विधिवत पूजा होऊन पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली.
समस्त मानकरी राऊत सुवासिनींच्या वतीने दुपारी ३.३० वाजता देवाला हळद लावण्यास सुरुवात झाली. महिला भाविकांनी मंदिरात देवाला हळद लावण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी मुकादम-पाटील, ग्रामस्थ, मानकरी, दागीनदार, सालकरी विश्वस्थ मंडळी हजर होते. ९.३० वाजता धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला.
जोगेश्वरी माता कक्षाची स्थापना
यात्रेनिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलीस, आरोग्य पथके, महिलांसाठी जोगेश्वरी माता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ,विश्वस्त हनुमंत धुमाळ,नामदेव जाधव, राजेंद्र कुरपड , संजय कापरे, दत्तात्रय समगीर उपस्थित होते.