खासगी गाड्या थेट आगारात

वल्लभनगर आगाराची सुरक्षा “रामभरोसे’

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) आगारात खासगी वाहनांचा गर्दी वाढली आहे. यामुळे येथील प्रवाशांना आगार परिसरात फिरतांना व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ना गाडी काढतांना व पार्किंग करतांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाला सांगून देखील कारवाई होत नसल्याने रिक्षा, मोटारी व दुचाकीचा आगारात सर्वत्र वावर असतो.

वल्लभनगर आगारातून पिंपरी-चिंचवड व उपनगरीय परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने येथून प्रवास करतात. यामुळे आगार परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, आगाराच्या आवारात थेट खासगी वाहने प्रवेश करीत असल्याने एसटी बसेसना काढण्यासाठी व पार्किंग करण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत आहे.

प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादामुळे वल्लभनगर आगारात राज्यभरातील आगाराच्या गाड्या ये-जा करतात. तर, आगाराला मोठी पार्किंग असल्याने येथे स्वारगेट व शिवाजीनगर आगाराच्या शिवशाही बसेस पार्किंगसाठी येतात. मात्र, आगारात अस्ता-व्यस्त खासगी रिक्षा, जीप, मोटारसायकल याचा वावर असल्याने प्रवाशांना आगारात सुद्धा मागे पुढे बघूनच चालावे लागते. रिक्षाचालक प्रवाशांना आगारात आतपर्यंत घेवून येतात. तसेच येथील प्रवाशांना भाड्याने जाण्यासाठी विचारुन हैराण करीत आहेत. यावर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे.

खासगी वाहनांना आगारात प्रवेश नाही. अवैधरित्या आगारात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, याबाबत वारंवार पोलिसांना सांगूनसुद्धा याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे आगारात रिक्षा, जीप ही वाहने प्रवेश करीत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल व कारवाई करण्यात येईल.

पल्लवी पाटील, सहायक अधीक्षक, वल्लभनगर आगार

Leave A Reply

Your email address will not be published.