पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाचा तडाखा वाढत असतानाच शहरातील मुख्य भागासह उपनगरामधील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. परिणामी शहरातील अनेक सोसायट्यांना विकतचे पाणी घ्यावी लागत असून, दरमहा लाखो रुपये मोजावे लागत आहेत. कृत्रिम पाणीटचाई करून टँकर लॉबीला पोसले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकसभेबरोबरच आगामी कालातील विधानसभा व महापालिका निवडणुकीत या कृत्रिम पाणीटंचाईचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
शहरातील वाकड, चर्होली, मोशी, डुडुळगाव, रावेत या भागात मोठे नागरीकरण झाले आहे. शेकडो सोसायट्यांनी या परिसर व्यापला आहे. मात्र, या सोसायट्यांना आजपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासन कायम अपयशी ठरलेले आहे. बांधकाम व्यावसायिकांना अटीशर्तींसह प्रकल्प पूर्णत्वाचा दाखल दिल्यानंतर आता सोसायटीधारकांना वॉटर टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. याचा मोठा फटका सोसायटीधारकांना बसत आहे. पाण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे.
शहरातील सर्वात वेगाने नागरीकरण होणारा परिसर अशी वाकड, रावेत, चर्होली, डुडळगाव, मोशी व परिसराची ख्याती आहे. याठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी गगनचुंबी इमारती उभारल्या आहेत. मात्र, या भागात होणारा पाणपुरवठा अपुरा असल्याने, पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी सोसायटीधारकांना खासगी टँकरकडून विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे अगदी पावसाळ्यातही याठिकाणच्या सोसायट्यांमध्ये खासगी वॉटर टँकरच्या खेपा सुरू असतात. हातात खुळखुळणार्या पाण्याच्या पैशाने राजकीय व्यक्तींशी सलगी ठेवणार्या अनेकांचे टँकर आता सोसायट्यांमध्ये रिकामे होत आहेत. तर राजकीय पाठबळाने वॉटर टँकर लॉबी चांगली गब्बर झाली आहे. तर सोसायटीधारकांना याची किंमत चुकवावी लागत आहे.
अशी आहे दरवाढ
लिटर क्षमता नवीन दर
6 हजार लिटर 700 रुपये
10 हजार लिटर 1200 रुपये
25 हजार लिटर 3000 रुपये
30 हजार लिटर 3600 रुपये
35 हजार लिटर 4200 रुपये
कमी दरात टँकर दिल्यास कारवाई
वॉटर टँकर संघटनेच्या वतीने केली दरवाढ या भागातील सर्व टँकर चालकांना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दरानुसार पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सुधारित दरवाढीनुसार पाणीपुरवठा न करणार्या वॉटर टँकर चालकांना 25 हजार रुपये दंड केला जाणार आहे.
ही आहेत दरवाढीची कारणे
वॉटर टँकरच्या दरवाढीची अनेक कारणे संघटनेने दिली आहेत. त्यामध्ये डिझेलच्या दरातील वाढ, वाहनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च , वाहन विमा, आरटीओ कर अशा विविध बाबींचा उल्लेख करत, दरवाढीचे समर्थन कले आहे.
मेन्टेननसमध्ये वाढ
सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीच्या पधाधिकार्याांन तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी वॉटर टँकरचे दरमहा लाखो रुपये बिल मोजणार्या अनेक सोसायट्या शहरात आहेत. तर महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोसासयट्यादेखील पाणीटंचाईच्या झळांपासून वाचू शकलेल्या नाहीत. याचा थेट परिणाम दरमहा आकारल्या जाणार्या देखभाल दुरुस्तीच्या रकमेत होत असल्याने, त्याचा आर्थिक भुर्दंड सोसायटीतील नागरिकांनाच सोसावा लागत आहे.