पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील नाले सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लहान मोठे नाल्यांची सफाई करण्यासाठी आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. पाऊस सुरू झाल्यास नाले सफाईचे काम करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच ही कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यातच ३१ मे पूर्वी शहरातील सर्व नाले साफ करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागाला दिले होते.
त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत शंभर किलोमीटर अंतराचे लहान-माेठे असे १४८ नाले साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले स्वच्छ केले जातात. शुक्रवारपासून आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात नालेसफाईला सुरूवात झाली आहे. आरोग्य विभागाकडून दररोज त्याचे अपडेट्स घेण्यात येत आहे.
आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने सफाई केली जात आहे. ज्याठिकाणी अरुंद नाले आहेत, तिथे मशिन जात नाही. अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात येत आहेत. सफाई पूर्वीचे आणि सफाई नंतरचे छायाचित्रही घेण्यात येत आहे. तसेच नालेसफाई व्यवस्थित हाेते की नाही ? याची आपण स्वतः पाहणी करणार आहाेत, असे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.