पुणे, दि. 12 -रस्ता ओलांडताना खासगी बसने धडक दिल्याने आर्मी बेस वर्कशॉप येथे टेक्निशियन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी 9 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. सुधीरकुमार बुक्के आणि ऍड. सुरेंद्र दातार यांच्या पॅनलने लोकअदालतमध्ये शनिवार हा दावा निकाली काढला.
तडजोडीसाठी अर्जदाराचे वकील ऍड. अनिल पटनी आणि ऍड. आशिष पटनी, गो. डिजिट जनरल इन्शुरन्सचे अधिकारी सुखप्रित सिंग आणि वकील सुनील द्रविड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मृत टेक्निशियन 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी सरदार चौक, मोशी येथे रस्त्या ओलांडत होते. त्यावेळी बसने धडक दिली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई यांनी ऍड. अनिल पटनी आणि ऍड. आशिष पटनी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला.
बसमालक आणि विमा कंपनी असलेल्या गो.डिलिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात सत्र न्यायाधीश आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य डी.पी.रागीट यांच्या न्यायालयात हा दावा दाखल झाला. मृत्यूसमयी ते 48 वर्षाचे होते. त्यांना दरमहा 80 हजार रुपये पगार होता. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचा विचार करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे हा दावा दाखल केल्यापासून एका वर्षात निकाली काढण्यात आलेला आहे. पक्षकारांना न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत असल्याचे ऍड. पटनी पिता-पुत्रांनी सांगितले.