Sapna Gill – Prithvi Shaw Controversy : दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ च्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता गेल्या वर्षीच्या वादाने आयपीएलच्या मध्यावर एन्ट्री केली आहे. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) या मोसमात फक्त एकच सामना खेळला असून त्याच्यासाठी वाईट बातमी आली आहे. वास्तविक शॉ पोलिसांच्या तावडीत अडकला आहे. सोशल मीडिया इंफ्लुएंसर सपना गिलच्या तक्रारीवरून न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. सपना गिलने पृथ्वी शॉवर विनयभंगाचा आरोप केला होता.
सपना गिलने ( Sapna Gill ) गेल्या वर्षी क्रिकेटपटू पृथ्वी शॉविरुद्ध केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. महानगर दंडाधिकारी एस.सी.तायडे यांनी पोलिसांना 19 जूनपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तथापि, पृथ्वी शॉ आणि इतरांविरुद्ध एफआयआर न नोंदवल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करण्याची गिलची याचिका मात्र न्यायालयाने फेटाळली आहे.
पृथ्वी शॉ याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. इंफ्लुएंसर सपना गिलने आरोप केला होता की, शॉने अंधेरीतील एका पबमध्ये तिचा विनयभंग केला होता. सेल्फी घेण्यावरून त्यांच्यात वाद देखील झाला होता. यादरम्यान पृथ्वी शॉ वरील हल्ल्याप्रकरणी सपना गिलला फेब्रुवारी 2023 मध्ये इतरांसह अटक करण्यात आली होती. सपना गिल सध्या जामिनावर आहे.
जामीन मिळाल्यानंतर तिने शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अंधेरी विमानतळ पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने तिने मॅजिस्ट्रेट कोर्टाचा आसरा घेतला.
IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : गुजरात-पंजाब आज आमने-सामने , ‘हे’ खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर…
शॉने आयपीएल 2024 सीझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला आणि पहिल्याच सामन्यात बॅटने शानदार खेळी खेळली. शॉने 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने झटपट 43 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून आलेल्या पृथ्वी शॉची कामगिरी निराशाजनक होती. पृथ्वी शॉ 10 चेंडूत 7 धावा करून बाद झाला.