सातारा -लोकांची गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर सर्व कार्यालयांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या नूतन इमारतीच्या आराखड्याची आ. शिवेंद्रराजेंनी पाहणी केली. नूतन वास्तू उभारताना नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा, सुनियोजित पार्किंग व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
येथील प्रांताधिकारी, तहसील कार्यालय कमी जागेत आहे. याच ठिकाणी अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगर भूमापन अधिकारी, मुद्रांक जिल्हाधिकारी, सेतू कार्यालय, 31 स्टॅप व्हेंडर, पिटीशन रायटर व कॅन्टिन आहे. कामानिमित्त या परिसराच्या आवारात दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून उपलब्ध जागा अत्यंत कमी पडते.
अंतर्गत वाहनांची पार्किंग व्यवस्था पुरेशी नाही आणि छोटी कार्यालये पाहता याठिकाणी नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होते. सर्वच कार्यालयांतील कामकाजामध्ये सुसूत्रता आणि सुलभता येऊन त्याचा फायदा नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी प्रांताधिकारी व तहसील कार्यालयासह या जागेतील सर्व कार्यालयांसाठी एक सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे राधिका रस्त्यावरील शासकीय जागेत नूतन इमारतीला मान्यता मिळाली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन आराखड्याची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता राहुल अहिरे, शाखा अभियंता रवी आंबेकर उपस्थित होते. या कामाचा 35 कोटींचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडून राज्याच्या महसूल विभागाकडे तातडीने पाठवा, ना. अजित पवार यांच्या सहकार्याने त्याला प्रशासकीय मान्यता घेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.