कोपनहेगन – ब्रिटनच्या खालोखाल महत्त्वाची राजेशाही असलेल्या डेन्मार्कच्या सम्राज्ञी मार्गरेट दोन यांनी आपले पद सोडले आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स फ्रेडरिक यांच्याकडे आता डेन्मार्कच्या सम्राटपदाची जबाबदारी येणार आहे. सर्वात जास्त काळ सम्राज्ञी पदावर राहिल्याचा विक्रम मार्गरेट यांच्या नावावर होता.
गेल्या वर्षी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यानंतर सर्वात दीर्घकाळ सम्राज्ञी पदावर राहणाऱ्या व्यक्ती म्हणून मार्गरेट यांच्याकडे पाहिले जात होते; पण गेल्या वर्षी त्यांच्यावर पाठीवर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आता थांबायची वेळ आली आहे असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी 31 डिसेंबरचा मुहूर्त साधून आपण यापुढे डेनमार्कची महाराणी म्हणून काम करणार नसून प्रिन्स फ्रेडरिकच आता डेन्मार्कचे महाराजे असतील अशी घोषणा केली.
महाराणी मार्गरेट या 83 वर्षाच्या असून 1972 मध्ये त्यांच्या पित्याच्या निधनानंतर डेन्मार्कचे महाराणीपद स्वीकारले होते. डेनमार्कमध्ये लोकशाही व्यवस्था आहे त्यामुळे निवडून येणारे प्रतिनिधी जरी देशाचा कारभार पाहत असले तरी औपचारिक सत्ता मात्र राजांच्या हातात असते आणि हा राजा कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्याने निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असते.
मार्गरेट यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर डेन्मार्कचे पंतप्रधान मेटल फेडरिक्सन यांनी त्यांचे आभार मानले आणि महाराणी आपले पद सोडत आहेत यावर माझा आणि डेन्मार्कच्या जनतेचा विश्वासच बसणार नाही कारण डेन्मार्कच्या जनतेसमोर महाराणी म्हणून दुसरे कोणाचेच नाव नाही असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.